कोकणातील भात शेती आणि त्यावरील रोग व उपाय



भात हे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि हवामानातील बदल यांसारख्या कारणांनी या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. 
भात हे कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता आणि हवामानातील बदल यांसारख्या कारणांनी या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी यापुढील काळात पिकाच्या व्यवस्थापनाकडे काटेकोर लक्ष द्यावे लागेल. यामध्ये लागवडीनंतरचे खतव्यवस्थापन, आंतरमशागत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन तसेच पिकावर येणा-या किडी व रोगांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो.
पावसाळी हंगामात हवेत जास्त प्रमाणात असणारी आद्र्रता, भात खाचरात साचून राहणारे पाणी आणि अनियमित पडणारा पाऊस या बाबी भात पिकावरील कीडरोगास कारणीभूत ठरतात. तसेच सततचे ढगाळ हवामान, जोराचा पाऊस आणि ऊनपाऊस यासुद्धा महत्त्वाच्या बाबी आहेत. भातावर प्रामुख्याने निळे भुंगे, पाने गुंडाळणारी अळी व सुरळीतील अळी या किंडीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच करपा व कडा करपा या रोगांचासुद्धा प्रादुर्भाव आढळतो.
निळे भुंगे
भुंगे निमूळते नळीसारखे लांबट असून गर्द निळय़ा रंगाचे असतात. भुंगे व अळी या दोन्ही अवस्था हानिकारक आहेत. भुंगे पानाच्या वरच्या पृष्ठभागातील हरितद्रव्ये खातात तर अळय़ा पान पोखरून आतील भाग खातात. त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसून येतात. यालाच स्थानिक भाषेत शेतकरी ‘शेडा पडणे’ असे म्हणतात.
पाने गुंडाळणारी अळी
या किडीची अळी अवस्था हानिकारक असून आपल्या लाळेने पानाच्या दोन्ही कडा लांबीच्या दिशेने एकत्र चिकटवून गुंडाळी करून आत लपून राहते आणि पृष्ठभागातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे गुंडाळीच्या बाह्य पृष्ठभागावर पांढरे चट्टे पडतात. याचा पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. पिकाची जोमदार वाढ, भरपूर पाऊस, अधूनमधून उघडीप व हवेतील गारठा हे हवामान किडीच्या वाढीस अत्यंत पोषक असते.
सुरळीतील अळी
या किडीची अळी फिकट, हिरवट आणि पांढरट असून कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून आत राहते. रात्रीच्या वेळेस अळी सुरळीतील हिरवा पापुद्रा आणि फक्त बाहेरील पापुद्रा शिल्लक ठेवते. अशा सुरळय़ा पानाच्या एका कडेस लटकत किंवा शेतातील पाण्यावर तरंगत असलेल्या दिसतात.
करपा
हा बुरशीजन्य रोग असून पानांवर डोळय़ाच्या आकाराचे म्हणजेच मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूंनी निमूळते ठिपके दिसतात. या ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी आणि कडा तपकिरी रंगाच्या असतात. अनेक ठिपके एकत्र मिसळून संपूर्ण पाने करपतात. रोगाचा प्रादुर्भाव पेरावर, लोंबीच्या देठावर तसेच दाण्यांवरसुद्धा आढळून येतो.
कडा करपा
या जिवाणूंमुळे होणारा रोग असून पाने टोकाकडून कडेने पानाच्या मध्य शिरेकडे करपतात. म्हणून या रोगास कडा करपा म्हणतात. जास्तीत जास्त फुटवे येण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास चुडातील संपूर्ण पाने करपतात. या अवस्थेला मर (क्रेसेक) असे म्हणतात. तर पीक फुलो-यात किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास दाणे भरत नाहीत.
भातातील किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. निळे भुंगे या किडीचा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव बांधावरील गवतावरसुद्धा आढळून येतो. त्यामुळे शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. पाने गुंडाळणारी अळी आणि सुरळीतील अळी या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास शेतात पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरती दोर आडवा ओढत न्यावा. त्यामुळे अळया आणि सुरळया खाली पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढून त्याचबरोबर बाहेर पडणा-या अळय़ा आणि सुरळया गोळा करून नष्ट कराव्यात.
निळया भुंग्याचा प्रादुर्भाव ज्या शेतात पाणी साचून राहते, अशा ठिकाणी आढळून येतो. पावसाने ओढ दिल्यास शेतकरी शेतात पाणी बांधून ठेवतात. अशा शेतात या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. त्यामुळे पाणी वाहते राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच पाणथळ ठिकाणी शिफारशीपेक्षा कमी वयाच्या रोपांची लागवड केलेल्या शेतातसुद्धा किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. आपल्या शेतामध्ये शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणातच वापर करावा. त्यामुळे कोळी, चतुर, नाकतोडे, ट्रायकोडर्मा या मित्रकीटकांचे संवर्धन होईल.
बेडूक हा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी यांचा शत्रू आहे. त्यामुळे भात खाचरात बेडकांचे जतन करावे. कीड व रोग नियंत्रण करावे. आर्थिक नुकसानीची पातळी ठरवण्यासाठी वेळोवेळी शेताचे निरीक्षण करावे. फवारणी ही पावसाची उघडीप बघून करावी. फवारणीच्या द्रावणामध्ये स्टिकरचा वापर करावा. त्यामुळे द्रावण चिकटून राहण्यास मदत होईल.
भातलावणी पार पडल्यानंतर बांध स्वच्छ ठेवावेत, शेतात किंवा आजूबाजूला पाणी जास्त काळ साठणार नाही याची काळजी घ्यावी, या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २ लिटर किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही ६२५ मिली किंवा लॅमडासायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही २५० मि.ली. ५०० लिटर/हेक्टर पाण्यातून फवारावे, करपारोग प्रामुख्याने प्रादुर्भित सुवर्णा व जानकी या जातींवर आढळून येत आहे.
या जाती करपारोगास बळी पडणा-या असल्यामुळे शक्य असल्यास या जातींची लागवड टाळावी. मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आढळल्यास अशी रोपवाटिका नष्ट करावी व बाजूच्या क्षेत्रातील भातावर करपारोगासाठी खालील उपाययोजना करावी. दोन रोपांमध्ये आणि ओळींमध्ये योग्य अंतर राखावे, नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा, नत्र खताबरोबर स्फुरद आणि पालाश यांचा शिफारशीनुसार वापर करावा, नत्र खताची मात्रा ४-५ हप्त्यांत विभागून द्यावी, शेतात रोग दिसून येताच खालीलपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
१० लिटर पाण्यामधे मिसळावयाचे औषध
औषधाचे नाव प्रमाण
ट्रायसायक्लॉझॉल ६ ग्रॅम
इडीफेनफॉस १० मि.ली.
आयसोप्रोथिओलेन १५ मि.ली.
प्रोपीकोनॉझॉल १० मि.ली.
आवश्यकता भासल्यास १५ ते २० दिवसांच्या अंतराने वरीलपैकी कोणत्याही एका औषधाची दुसरी आणि तिसरी अशा तीन फवारण्या केल्यास प्रभावी रोग नियंत्रण करता येते असे कृषी विद्यापीठाने म्हटले आहे.
(लेखक हे पीक संरक्षण विशेषज्ज्ञ म्हणून
कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहेत)

Comments

Popular posts from this blog

मिरची लागवड तंत्रज्ञान

सिंधुदुर्गमध्ये आंबा लागवडीचा प्रथमच ‘इस्त्रायली’ प्रयोग